लोणार सरोवराच्या बाजूचे विस्मयकारी रामाचे मंदीर...|vismaykari ram mandir of lonar lake

 लोणार सरोवराच्या बाजूचे विस्मयकारी रामाचे मंदीर...


 

लोणार सरोवराच्या(lonar lake) पाण्यापाशी जाताना उंचावरून एका पायवाटेने खाली उतरत यावं लागतं... हा रस्ता नागमोडी वळणाचा आणि जंगलातून जाणारा आहे...याचं पायवाटेवर जरासं आडवाटने बाजूला काही अंतर चालतं गेलं की डाव्या बाजूला थोडंसं उंचावर हे एक अदभूत आणि खास वैशिष्ट्यपूर्ण असे श्रीरामाचे मंदिर आहे...मोडतोड आणि अत्यंत दुर्लक्षित झालेलं हे मंदिर अजूनही त्याच्या पुराणकालीन वैभवशाली श्रीमंतीची साक्ष देत उभे आहे...

             या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात फक्त श्रीरामाची मूर्ती आहे, सहसा श्रीराम यांची एकटी मूर्ती कधीही नसते... श्रीरामाच्या एका बाजूला बंधू लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला पत्नी सीता उभे असतात.अजून खास म्हणजे श्रीराम यांची ही मूर्ती निशस्त्र अवस्थेत आहे आणि हे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे.श्रीरामाच्या हातात कायम धनुष्यबाण दाखवले जाते जे या मूर्तीत नाही. यामागे एक खास कारण आहे.श्रीराम वनवासात असताना येथे या सरोवराच्या बाजूला वास्तव्यास असताना त्यांचे वडील दशरथ यांचे निधन झाले... श्रीरामांनी आपल्या वडिलांचा दशक्रियाविधी येथून वीस किमी अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या काठी मेहकर येथे केला...तेथेच श्री बालाजी यांची खास मूर्ती आहे त्यावर मागच्या भागात लिहिले आहेच. श्रीराम यांना आपल्या वडीलांचे पिंडदान करायचे होते आणि ते वनवासात असल्याने त्यासाठी अट अशी होती त्या विधीसाठी श्रीराम निशस्त्र असायला हवेत आणि त्यांच्याबरोबर कोणी स्वकीय असायला नको...हेच पिंडदान श्रीरामांनी या सरोवराच्या बाजूला केले आणि त्याचं ठिकाणी सध्याचे हे निशस्त्र श्रीरामाचे मंदिर आहे...

 

             या मंदिरात एक अचंबित करणारी गोष्ट अशी या ठिकाणी तुम्ही गाभाऱ्यात मूर्तीच्या समोर उभे राहून हात जोडून नमस्कार करायला उभे राहिलात की तुम्हाला  श्रीरामांच्या मूर्तीच्या एका बाजुला लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला सीता मातेचे दर्शन होते...हे खूपच आश्चर्यकारक आहे... त्यामागे एक खास कारण आहे...या मंदिरात सभामंडपात दगडी सुबक नक्षीकाम केलेले बारा खांब आहेत, जे एका विशिष्ट रचनेत मंदिरात बसवले गेले आहेत...चार मोठे खांब सभामंडपात मध्यभागी आणि चार छोटे खांब उजव्या बाजूला आणि चार डाव्या बाजूला...हे खांब अशा रितीने बसवले गेले आहेत की ज्यावेळी आपण मूर्ती समोर हात जोडून उभे असतो त्यावेळी प्रकाशाची किरणे विशिष्ट कोनातून परावर्तित होईन आपली स्वतःची सावली श्रीरामाच्या मूर्तीच्या बाजूला अशा प्रकारे पडते की आपल्याला त्या मूर्तीच्या एका बाजूला सीतामाता आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण उभे आहेत हा भास निर्माण होतो...मी हे प्रत्यक्ष बघितल्यावर अंगावर रोमांच उभे राहिले...जरा विचार करा त्यावेळी आजच्या सारखे कॅलक्युलेटर , संगणक, दुर्बीण, होकायंत्र असे कोणतेही अद्ययावत साधन सामुग्री उपलब्ध नसताना हे त्यांनी कसे निर्माण केले असेल?...अहो एक दोन सेंटीमीटर जरी खांबांची लांबी, रुंदी, ठेवण बदलली तरी ही विस्मयकारी गोष्ट साकारणे केवळ अशक्य आहे...यावरून त्याकाळी विज्ञान किती प्रचंड ताकदीचे होते याची प्रचिती येते. एवढंच नाही तर या मूर्तीच्या समोर उभे राहून तुम्ही आपले दोन्ही हात डोक्यावर सरळ उभे नेऊन डावीकडे उजवीकडे बाय बाय केल्यासारखे हलवले तर श्रीरामांच्या मस्तकाच्या वर मागच्या भिंतीवर या आपल्या हातांच्या सात सात सावल्या पंखा घालत असल्यासारख्या हलताना दिसतात...हे दोन्ही प्रकार मी स्वतः प्रत्यक्ष अनुभवल्यावर माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला... असे अजूनही खास वैशिष्ट्य या मंदिरात आढळले...यावरून जरा विचार करा की आपले पूर्वज किती विद्वान आणि प्रचंड कलात्मक होते...त्यावेळेसची पाषाण शिल्पकला किती अफाट होती... आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं हे भव्यदिव्य आहे,  पण काळाच्या ओघात अक्षरशः नेस्तनाबूत होत आहे...


अरे हो अजून एक खास बाब अशी या मंदिरात होकायंत्र काम करत नाही... तिथे मंदिरात विश्रांतीसाठी खाली जमिनीवर बसलो असताना होकायंत्र काढून वेगवेगळ्या दगडावर ठेऊन पाहिलं तर त्या होकायंत्राची सुई दक्षिण उत्तर दाखवत नाही...वेगवेगळ्या दगडावर होकायंत्र ठेवलं की ती सुई भरकटत जाते पण स्थिर दक्षिण उत्तर होत नाही...आहे की गमतीशीर?... अर्थात यामागे शास्त्रीय कारण आहे...या मंदिराची सध्याची अवस्था पाहून मन विषण्ण झालं... इतकं मोठं वैभव आपल्याकडे आहे याचा खरोखरचं अभिमान वाटतो...



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने