नवसाक्षरता वर्गांची राज्यस्तरीय अधिकारी करणार पाहणी, शिक्षण संचालकांसह अधिकारी देणार भेट.-Ministry of education
सध्या सुरू असलेल्या उल्हास नवभारत साक्षरता(New India Literacy Programme-NILP) कार्यक्रमांतर्गत साक्षरता वर्गाची पाहणी करण्यासाठी शिक्षण
संचालनालयातील अधिकारी हे क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा, तालुका आणि निवडक शाळांना डिसेंबर महिन्यात भेटी देऊन आढावा घेणार आहेत. याबाबत योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणीसाठी ऑनलाईन पद्धतीने बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांमधून दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा, तालुका व शाळा स्तरावरील झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल. नव-भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर केलेली पूर्वतयारीचा, उल्लास मेळावा पूर्वतयारी व कार्यवाहीचा, तसेच शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी योजना संचालनालयातील अधिकारी जिल्हा, तालुका कार्यालयांना आणि निवडक शाळांना भेटी देणार आहेत.
भेटी दरम्यान संबंधित अधिकारी (योजना) कार्यालय, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, शाळा तसेच उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सुरू असलेले वर्गाना भेटी देतील. असाक्षर व स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच शाळांमधून विविध शासकीय योजनांची सुरू असलेल्या अंमलबजावणीची पाहणी करून त्याची माहिती घेणार आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संचालनालय स्तरावरून भेटी देण्यासाठी येणार्या अधिकार्यांसोबत जिल्ह्या कार्यालयातील वर्ग -१ किंवा वर्ग-२ दर्जाचे अधिकारी दौर्यात पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहेत. दरम्यान शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विभागातील संचालक ते केंद्रप्रमुख या सर्व क्षेत्रीय स्तरावरील कार्यक्रमाचा आढावा घेतला.