रोमानिया येथील प्रेतात्मा असलेल्या जंगलाचे रहस्य काय आहे? | Pretatma in Rumania

रोमानिया येथील प्रेतात्मा असलेल्या जंगलाचे रहस्य काय आहे?

२०० मेंढ्या घेऊन होईया निघाला होता. दूरवर तो चालत चालत आला. मेंढ्या चरत होत्या.. होईया विचार करत होता… पण त्याने विचारही नसेल केला की आजनंतर तो कधीच पुन्हा परतणार नाहीये….. !!!!!!



 

जगातल्या प्रत्येक देशाचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि त्या वैशिष्ट्यांमुळे त्या त्या देशाला जगात वेगळी ओळख आहे. रोमानिया हा असा एक देश आहे ज्या देशाला जगात एका जंगलामुळे ओळखले जाते. ही गर्द वनराई या देशाची ओळख झालेली आहे.


या जंगलाला होईया बसाऊ या नावाने ओळखलं जातं. युरोप खंडात वसलेला रोमानिया हा देश. यातल्या ट्रान्सिल्व्हानिया या प्रदेशात एकूण ७०० एकर एवढ्या जमिनीवर पसरलेलं हे जंगल.



इथे घडल्या आहेत खूप साऱ्या चमत्कारिक आणि रहस्यमयी घटना. इतरांसाठी हा चर्चेचा सामान्य असा विषय असेल पण रोमानिया देशातल्या नागरिकांसाठी हा काही सामान्य विषय नाही. गेले ३ शतकं ही लोकं नवनवीन अनुभव घेत आहेत. भरपूर घटना आशा आहेत की विज्ञानाला त्यांचा अर्थ लावता आलेला नाहीये.


भरपूर यूट्यूबर लोक इथे सर्वाईविंग व्हिडिओज बनवण्यासाठी जातात. की या ठिकाणी अशाप्रकारे जायला हवं , असं राहायला हवं , हे करायला हवं वगेरे वगेरे पण ती लोकही बहुतेक वेळेस दिवसाच जाताना दिसतात आणि रात्रीच्या अंधारात गेले जरी तरी फार आत जात नाहीत. कारण घडलेल्या घटना तेही ऐकून आहेतच.



अशा कोणत्या अलौकिक गोष्टी आढळल्या आहेत तिथे ? काय आहेत त्या विस्मयकारी घटना … ?????


१:- ती नापीक जागा




सदर चित्रात दाखवली आहे तीच ती जागा आहे. दिसते ना एखाद्या क्रिकेट ग्राउंडसारखी ??? पण आश्चर्य हे आहे की या गोलाकार जागेवर एकही झाड नाहीये. चारही बाजूंनी बघा एकदम गर्द वनराई आहे. पण नेमक्या त्याच एका गोलाकार भागात फक्त बारीक बारीक गवत आहे. त्या देशातल्या वैज्ञानिकांनी एकदा त्या जागेवरची माती घेतली आणि परीक्षण केलं. मग जिथे झाडं आहेत तिथली माती सुद्धा घेतली आणि परीक्षण केलं. दोन्ही मात्या एकदम सारख्या होत्या. पण असं असूनही कधीच त्या जागेवर एकही वृक्ष आकाराला आला नाही.का नाही आला ?? याचं उत्तर देखील कुणालाच देता आलं नाही.


२:- वृक्षांचा वाकडेपना




साधारणपणे कुठलंही झाड हे पूर्णपणे सरळ नसतंच. ( अपवाद काही विशिष्ट प्रजाती ) पण म्हणून वाकडेपनाला देखील काहीतरी मर्यादा हवी ना !! पण या जंगलातली झाडे प्रचंड वेगळी आहे. J या आकारात ती दिसतात आणि वरती एकदम सरळ जातात. काही झाडे असती तर ठीक होतं पण इथे सगळं जंगल असच आहे. बरं असही नाही की ही झाडे एखाद्या विशिष्ट जातीची असतील… ही तीच सामान्य झाडे आहेत जी सगळीकडे आढळतात. वेगवेगळ्या जातींची. पण वाढ मात्र इथे प्रत्येक झाडाची एकसारखीच होते. हा चमत्कार जगात इतर कुठेही सहजासहजी बघायला मिळत नाही. म्हणजेच संपूर्ण जगात फक्त याच ठिकाणी हा प्रकार आढळला. ही झाडं अशी का आहेत याचही कुणाकडे उत्तर नाही… !! तर्क मात्र खूप लावले गेले आहेत.


३:- तो गडद प्रकाश




भरपूर नागरिकांना इथे एक विचित्र असा अनुभव आला आहे की रात्रीच्या वेळी जंगलात कुठूनही कोपऱ्यातून गडद असा प्रकाश दिसू लागतो. त्या प्रकाशाचा स्त्रोत कुठे आहे हे अजूनही दिसलेलं नाही. आणि तो प्रकाश देखील वेगवेगळ्या नक्षी स्वरूपात येतो साधारण भाषेत सांगायचं म्हणजे डिझाईन जशी असते त्या प्रकारे तो प्रकाश येतो. मध्यभागी जास्त चमकतो.


याचा सुगावा लावण्यासाठी एकदोन वेळेस पॅरानॉर्मल संशोधकांची एक तुकडी तेथे जाऊन आली सोबत त्यांनी " इन्फ्रालाईट डीटेक्टर्स यंत्रे आणि थर्मल पॉवर मीटर यंत्रे " सुद्धा नेली होती. कारण जिथूनही प्रकाश येत असतो तिथे उष्णता निर्माण होत असते. पण आश्चर्य म्हणजे तिथे गेल्यावर कुठलीच उष्णता यंत्राने दाखवली नाही. आणि प्रकाशाचा मूळ स्त्रोत काय आहे हे देखील ओळखता आलं नाही . प्रकाश एका रंगाचा नाही तर विविध रंगाचा येतो आणि तो विशिष्ट प्रकाश कधी आणि कुठे येईल हे सांगता येत नाही. इतकच काय ते संशोधकांना मिळालं.


४:- ते नको वाटणारे आवाज आणि तो अविरत पाठलाग .




या जंगलात आजवर जितके लोक गेले ते सर्वच पुन्हा परतले असं नाही … पण जे परतले ते सांगतात की जंगलात थोड्या अंतरावर गेलं की तुम्हाला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं वाटू लागतं. म्हणायला अस्वस्थता कमी होते पण कशाची तरी जाणीव तीव्र होऊ लागते. बाहेरचा आवाज पूर्णपणे बंद होतो. शांतता इतकी भयानक पसरते की असं वाटू लागतं आपण एखाद्या पोकळीत आलो आहोत … शांतता …. पण नंतर जाणवू लागतं. की या शांततेपलीकडे काहीतरी वेगळेच आवाज ऐकायला येत आहेत. ते आवाज इतके तीव्र होतात की कानांची संवेदनाच बंद होऊन जाते. एकाच वेळी पोकळी आणि ते विचित्र आवाज जाणवायला लागतात.


आणि संपूर्ण जंगलात आपण एकटे असतो पण आपल्याला सतत अशी जाणीव व्हायला लागते की कुणीतरी आपला पाठलाग करत आहे. कुणाचीतरी आपल्यावर तीक्ष्ण नजर आहे. कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवतय. आणि ही जाणीव एखाद्या जनावराची नसते…. मनुष्याची असते. आपण जितके आत जाऊ ही जाणीव … तो आवाज आणि अस्वस्थता प्रचंड वाढू लागते.


५:- शरीरावर उठलेल्या जखमा




एका तुकडीच्या अनुभवानुसार ते लोक जेव्हा जंगलात गेले होते तेव्हा थोड्या अंतरावर आत गेल्यावर त्यांना अस्वस्थता जाणवू लागली … ती शांतता आणि ते आवाज तर होतेच शिवाय प्रचंड घाम अंगाला येत होता. डोकं गरगर फिरत होतं. डोकेदुखी होतीच. एक अनामिक हुरहुर मनाला लागत होती. मळमळ होत होती आणि पैकी काही जणांना तिथे उलटी सुद्धा झाली होती. आणि जेव्हा हा सगळा त्रास असहाय्य होऊन ते सर्वजण बाहेर पडले तेव्हा त्यांना अचानक त्यांच्या शरीरावर मोठमोठ्या जखमा आणि लाल डाग - चट्टे पडलेले दिसले. हे जवळजवळ संपूर्ण शरीरावर होतं. म्हणायला हे लोक पूर्ण पोशाख परिधान करून गेले होते आणि सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शरीर झाकलं जाईल असेच कपडे त्यांनी घातलेले होते. शिवाय कुणालाच कुठलाही रोग किंवा आजार नव्हता …. पण तरीही प्रत्येकाच्या शरीरावर ते डाग पडलेले दिसले. त्या जंगलातून परत आल्यावर भरपूर जणांची प्रकृती देखील बिघडली असे त्यांनी सांगितले. हे काहीतरी चमत्कारिक आहे खरंच …. किंवा नाही हे मात्र नक्की सांगता येत नाही कारण आपण तर्क देखील इथे लावू शकतो… जसे की मळमळ उलटी या गोष्टी आतल्या वातरणामुळे झाल्या असतील. जेव्हा शरीरात काही बिघाड होतो तेव्हा पहिला प्रभाव डोके आणि डोळे या भागांवरच पडतो त्यामुळे डोकेदुखी झाली असावी. आणि अंगावरील डाग कदाचित एखाद्या विषारी झाडाचा स्पर्श झाल्याने किंवा एखाद्या किड्याच्या चावण्याने देखील झाला असेल. पण शेवटी हे सर्व तर्क आहेत… !!!


या जंगलाबद्दल दोन कथा ऐकिवात आहेत. ज्यामुळे हे वन जगभरात प्रसिद्ध झालं.या दोन्ही कथा खूप वेगवेगळ्या कालखंडात घडलेल्या आहेत. पण दोन्हीही विस्मयकारी आहेत.


१:-


१८८० च्या काळातली गोष्ट. या गावातल्या एका शेतकऱ्याची मुलगी जी त्यावेळी ५-६ वर्षांची असेल ती एकटीच खेळत खेळत या जागेवर आली. ती जंगलात शिरली. खेळत खेळत ती पुढे पुढे जात राहिली. आणि जातच राहिली….


शेतकरी आणि त्याचं कुटुंब त्या मुलीचा शोधाशोध करू लागले सोबतीला गावातले इतर लोकही होते. सगळीकडे शोध घेतला तरी मुलगी मिळाली नाही. एका ठिकाणी हे कळलं की मुलीला त्या जंगला जवळ जाताना बघितलं. शेतकरी आणि काही इतर पुरुष मंडळी त्या जंगलात गेली पण जास्त दूर त्यांना जाता येईना … एकतर रात्र आणि त्यात या जंगलाबद्दलच्या ऐकिवात कथा. शेवटी सर्वांनी माघार घेतली आणि शेतकऱ्याने देखील आपण मुलगी गमावली अशी स्वतःची समजूत केली.


……..


वर्षे गेली …… ५ वर्षे गेली.


एक दिवस अचानक जंगलातून कुणीतरी येताना दिसलं. तीच मुलगी होती. तिच्यात कमालीचा बदल झाला होता. पण तिची ओळख सर्वांना पटली. ती आली त्यावेळी ती काहीशी अशी दिसत होती.




बदल झाला होता पन भरपूर विचित्र गोष्टी आढळून आल्या. तिचं बोलणं बंद झालं होतं. तिला तिची स्वतःची ओळख नव्हती राहिली. तिला तिचे आईवडील ओळखता येत नव्हते. शिवाय तिला जगाचं भान देखील नव्हतं. ती स्वतः मध्येच हरवून होती. तिच्या संवेदना संपल्या होत्या. जगात काय सुरू आहे याची तिला काहीच खबर नव्हती.


वर्ष - दीड वर्ष झालं.


एका दिवशी एका ठिकाणी ती मृत अवस्थेत आढळली !!


२:-


या जागेला होईया बसाऊ या नावाने ओळखतात …. पण हे नाव कुणाचं आहे ????


हे नाव एका मेंढपाळाचं आहे.


होईया बसाऊ हा त्याच गावातला एक मेंढपाळ होता. त्याच्याकडे भरपूर मेंढ्या होत्या. एक दिवस नेहमीप्रमाणे तो मेंढ्यांना चरायला घेऊन गेला. आणि नेमका त्या अरण्याजवळ येऊन पोचला. त्याला याची कल्पना होती. मेंढ्या हळू हळू आत आत जाऊ लागल्या. त्या २०० मेंढ्या असल्यामुळे त्यांना एकाचवेळी चटकन दुसऱ्या बाजूला वळवणे कठीण होते. रात्र होऊ लागली होती. अंधाराचं साम्राज्य हळू हळू बळकट होत होतं. काय करावं आणि कसं करावं हा विचार होईया करत होता पण विचार करता करताच त्यांचं भान कायमचं हरवून गेलं. कारण तो खूप आतल्या भागात येऊन पोचला होता. त्या जागेने त्याच्या मेंदूवर विळखा घातला होता.



दुसऱ्या दिवशी पासून गावकऱ्यांना ही बातमी कळू लागली तसे ते लोक त्याला शोधायला बाहेर पडले जमेल तिथे सगळीकडे शोधून झालं. शेजारच्या गावांत विचारपूस झाली. एक एक गाव करत करत त्यांनी जवळपास संपूर्ण जिल्ह्यात विचारपूस केली होती.पण कुठेच काहीही मिळालं नाही.


होईया तर गायब झाला होताच. पण त्याच्या बरोबर त्या २०० मेंढ्या देखील रात्रीतून बेपत्ता झाल्या होत्या. गावकऱ्यांना धडकी भरली होती. आणि हे प्रकरण सगळीकडे माहिती झालं होतं. या गोष्टीपासूनच त्या जागेला होईया बसाऊ या नावाने ओळख मिळाली.


रोमानिया देशातले नागरिक या गोष्टींना फक्त गोष्टी किंवा कथा नाही मानत . तर या खऱ्या घटना आहेत असे ते मानतात.


मग या सर्व गोष्टी जगासमोर कधी आल्या ????


१९६८ साली एक लष्करी तंत्रज्ञ इमिल बराण्या हे त्यांच्या तुकडी सोबत या जंगलात संशोधन करत होते. संशोधन करताना ते दुर्बिणीने आकाशात बघत होते …. अचानक त्यांना आकाशात एक तबकडी उडत असलेली दिसली. त्यांनी खात्रीपूर्वक बघितलं की ते विमान किंवा हेलिकॉप्टर तर नाही !!! पण नाही त्यांना तो आकार वेगळाच भासला एखाद्या हवाई परिवहन अर्थात UFO सारखा. सुरुवातीला त्यांना देखील यावर विश्वास बसेना कारण तेव्हाही ही एक संकल्पनाच होती.जी बघितली असल्याचे लोक दावे करत होते. पण त्या दिवशी इमील यांना स्वतः तो अनुभव आला.



ईमिल यांच्याच तुकडीतल्या काही सहकाऱ्यांना त्याच दिवसांत आणखी एक विचित्र अनुभव आला. एका ठिकाणी दुपारच्या वेळी निरीक्षण करताना त्यांना अचानक जंगलाच्या मध्यभागी असलेल्या भागातून खूप तीव्र असा प्रकाश संक्रमित होताना दिसला. आणि त्याच प्रकाशातून एक मानवी आकृती आकाशात जाताना दिसली



या घटना इतक्या वेगाने घडल्या होत्या की त्यांना कॅमेरा वापरून त्या टिपून देखील घेता आल्या नाही. आणि असही त्याकाळी साधारण एक फोटो काढायला देखील खूप वेळ लागायचा. कॅमेरे तेवढे विकसित नव्हते. त्यामुळे यातल्या बहुतेक प्रसंगांचे फक्त काल्पनिक छायाचित्रेच उपलब्ध आहेत.


या दोन घटनांनी संपूर्ण जगातल्या जाणकारांना या चमत्कारिक जंगलाबद्दल माहिती झालं होतं. तेव्हापासून अनेकांनी संशोधने केली… नंतर मुलाखती केल्या … दरवेळी नवनवीन काहीतरी हाती येत गेलं. पण कुठल्याही गोष्टीचं ठोस कारण मिळू शकलं नाही की ती घडण्यामागे काय कारण असेल.


मग नक्की असं काय आहे या ठिकाणी ????


नक्की काय आहे … हे तर अजून वैज्ञानिक देखील शोधू शकले नाहीयेत. सर्वांनीच अंदाज लावले आहेत. पण वैज्ञानिक एका गोष्टीबाबत थोडेफार खात्रीशीर आहेत की या ठिकाणी एक Interdimantional Portal …. ( अंतरमितिय भाग ) असावा. एक प्रचंड गुरूत्वीय शक्ती - ऊर्जा इथे असावी जी की सर्वसामान्य नाहीये. ज्याचं बल हे प्रचंड जास्त आहे. आणि कदाचित काहीतरी असही असू शकतं जे मानवाला अजूनही पूर्णपणे शोधता आलेलं नाहीये.




हे पोर्टल म्हणजे एक अशी जागा जिथे गेल्यावर तुमची शुद्ध हरपते … म्हणजे तुम्ही जिवंत आणि जागी तर असता पण एका वेगळ्या जगात प्रवेश करता. जिथे तुम्हाला सगळं काही नवीन आहे. तुम्ही कोण आहात - कुठून आलेले आहात - तुमची ओळख तुम्ही पूर्णपणे हरवून बसता. जिथे तुम्हाला वेळेचं काहीच भान राहत नाही. वेळ तुमच्यासाठी जणूकाही थांबून गेली आहे. एक असं विश्व जिथे तुमचं शरीर तर सुरू असतं पण तुमचा मेंदू काम करत नाही. ( म्हणजेच मेंदूच्या संवेदना बंद होतात ) तुमची तहानभूक हरवून जाते !


असं म्हणतात की या पोर्टल मधून जाऊन काही लोक वापस देखील आलेली आहेत. पण काही लोक कायमची त्या अपरिचित विश्वात स्थायिक झाली. बरं असही नाही की एखाद्या विशिष्ट जागेपासून ते पोर्टल सुरू होतं…. नाही …. ते अदृश्य आहे… ते कुठूनही सुरू होऊ शकतं. कुठे संपेल हे मात्र सांगता येत नाही.


या जंगलातून परत आल्यावर व्यक्ती आत घालवलेले ७० ते ८०% प्रसंग पूर्णपणे विसरून जातो. त्याला काय काय झालं होतं हे काहीच आठवत नाही . इथून परतल्यावर डोकेदुखी आणि उल्टीचा प्रचंड त्रास होतो. शिवाय या जंगलात कुठलंही विद्दुत उपकरण चालत नाही असं निरीक्षण देखील नोंदवलं आहे.


हे जंगल चमत्कार आहे की विज्ञान आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. स्थानिक लोक या सर्व गोष्टींना भुताटकी म्हणतात. यात प्रेतात्मा - पिशाच - भूत वगेरे आहे असं मानतात. पण हे अगदी असच नसेल. याला शास्त्रीय कारणे नक्कीच मिळतील.


आज आपण इथेवर येऊन पोचलो आहोत ते फक्त विज्ञानामुळे … असंख्य प्रश्नांची उत्तरे विज्ञानाने दिली आहेत. पण आजही जर अलौकिक ठिकाणे … अलौकिक शक्ती …. चमत्कार - भुतप्रेत …. जादू … रहस्य अशा गोष्टी अस्तित्त्वात आहेत. याचा अर्थ विज्ञानाला अजून खूप पुढे जायचं आहे. खूप प्रगती करायची आहे. एक दिवस या सर्व गोष्टींचं उत्तर मनुष्याकडे असेल. नक्कीच !!!!


सर्व छायाचित्रे स्त्रोत :- गुगल संकेतस्थळे


माहिती स्त्रोत :- गुगल आणि यूट्युब

 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने