घेवड्यावरील कीड व्यवस्थापन

घेवड्यावरील कीड व्यवस्थापन 



 


मावा : मावा कीड घेवडयाच्‍या पानातील रस शोषून घेते. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वळतात. मावा किड वाढणा-या फांद्या आणि लहान पानांतील रस शोषून घेते. या किडीच्‍या प्रादुर्भावामुळे काहीवेळा फूलांची गळ होते.


उपाय : मावा किडीच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात सायपरमेथीन (25 टक्‍के प्रवाही) 5 मिली किंवा 10 मिलीलीटर रोगोर (30 टक्‍के प्रवाही ) या प्रमाणात पाण्‍यात मिसळून फवारावे.


शेंगा पोखरणारी अळी : ही किड प्रथम शेंगाच्‍या पृष्‍टभागावर आढळून येते. ही किड नंतर शेंगेच्‍या आत शिरून आतील दाणे खाऊन फस्‍त करते.


उपाय : या किडीचा उपद्रव दिसून येताच 5 टक्‍के कार्बरिल दर हेक्‍टरी 20 किलो या प्रमाणात धुराळावे


खोडमाशी : लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांत या किडीचा मोठया प्रमाणावर उपद्रव होतो. या किडीचे मादी फूलपाखरू पीक पहिल्‍या दोन पानांवर असतांना पानांवर अंडी घालते. अंडी उबवल्‍यानंतर अंडयामधून अळया बाहेर पडतात. अळी खोडावर जाते आणि खोडाच्‍या आतील भाग पोखरून खाते. या किडीचे सुप्‍तावस्‍थेत कोश जमिनीलगत खोडामधून पडतात.


उपाय : खोडमाशीच्‍या अळीच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 5 मिलीलिटर सायपरमेथीन (25 टक्‍के प्रवाही) हे कीटरनाशक मिसळून फवारणी करावी.


रोग


भूरी : हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाची पिकाला लागण झाल्‍यास पानावर, काडयावर आणि शेंगावर पांढरी पावडर असलेले ठिपके दिसतात.


उपाय : घेवडयावरील भूरी रोगाच्‍या नियंत्रणासाठी 300 मेश गंधकाची भुकटी दर हेक्‍टरी 30 किलो प्रमाणात धुराळावी.


तांबेरा : तांबेरा हा बुरशीजन्‍य रोग असून त्‍यात पानाच्‍या खालच्‍या भागावर तांबूस काळपट रंगाचे फोड येतात.


उपाय : तांबेरा रोगाच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 20 ग्रॅम डायथेन एम-45 हेक्‍टरी बुरशीनाशक मिसळून तांबेरा रोगाची लागण दिसून येताच फवारणी करावी.


मर : मर (विल्‍ट) हा बुरशीजन्‍य रोग असून या रोगाची पिकाला लागण झाल्‍यास झाडांची पाने पिवळी पडून ती गळतात.


उपाय : मर रोगाच्‍या नियंत्रणासाठी बियाण्‍यास पेरणीपूर्वी बुरशीनाशक औषध चोळावे किंवा घेवडयाच्‍या रोगप्रतिबंधक जाती लावाव्‍यात.


उत्‍पादन

श्रावण घेवडयाचे हेक्‍टरी उत्‍पादन  27 क्विंटलपर्यंत घेता येते.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने