असे जगावे!-मराठी कविता इ.७वी|गुरु ठाकुर|ase jagave-marathi kavita

 असे जगावे!-मराठी कविता

   

असे जगावे, छाताडावर 

आव्हानाचे लावून अत्तर

नजर रोखुनी नजरेमध्ये, 

आयुष्याला दयावे उत्तर!


नको गुलामी नक्षत्रांची, 

भीती आंधळी ताऱ्यांची

आयुष्याला भिडतानाही, 

चैन करावी स्वप्नांची

असे दांडगी इच्छा ज्याची, 

मार्ग तयाला मिळती सत्तर

नजर रोखुनी नजरेमध्ये, 

आयुष्याला दयावे उत्तर!


पाय असावे जमिनीवरती, 

कवेत अंबर घेताना

हसू असावे ओठांवरती, 

काळीज काढून देताना

संकटासही ठणकावून सांगावे, 

ये आता बेहत्तर

नजर रोखुनी नजरेमध्ये, 

आयुष्याला दयावे उत्तर!


करून जावे असेही काही, 

दुनियेतून या जाताना

गहिवर यावा जगास साऱ्या, 

निरोप शेवट देताना

स्वर कठोर त्या काळाचाही, 

क्षणभर व्हावा कातर कातर

नजर रोखुनी नजरेमध्ये, 

आयुष्याला दयावे उत्तर!

असे जगावे ही कविता तालासुरात ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओ वर क्लिक करा.
                    

 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने