निसर्गाचं देणं - कृतज्ञता गोष्ट |मराठी बोधकथा|Law of Diminishing Marginal Utility|moral story|

निसर्गाचं देणं - कृतज्ञता गोष्ट 



 

एका जंगलात एक शिकारी आपल्या सावजाचा पाठलाग करता करता रस्ता चुकला. सावज तर पळूनच गेले आणि ह्या शिकाऱ्याला जंगलाच्या बाहेर पडायचा मार्ग मिळे ना! मार्ग शोधता शोधता तो आणखीनच जंगलाच्या आतल्या भागात गुंतत गेला.एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले तरी हा शिकारी जंगलाच्या बाहेर पडू शकला नाही.भुकेने व्याकूळ झालेला हा माणूस कुठे काही खायला मिळतेय का ते शोधू लागला.तेवढ्यात एक सफरचंदाचे झाड त्याच्या दृष्टीस पडले. धावतच तो त्या झाडाकडे गेला आणि त्याने सफरचंद काढण्यास सुरुवात केली. दहा सफरचंद काढल्यानंतर त्याने एका जागी बसून ती खायला सुरुवात केली.तीन दिवसांचा उपास घडलेल्या त्या शिकाऱ्याने पहिले सफरचंद मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्याच बरोबर ते सफरचंद मिळाल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभारही मानले.दुसरे सफरचंद खाताना त्याला पहिल्या सफरचंदाएवढा आनंद मिळाला नाही. तरीही त्याने भुकेपोटी ते खाल्लेच; आणि देवाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.जसजसे त्याचे पोट भरू लागले तसतशी त्याला त्या पुढच्या सर्व  सफरचंदांमधील गोडी कमी वाटू लागली. दहावे सफरचंद तर त्याने टाकून दिले.ह्या मानवी वृत्तीला अर्थशास्त्रामध्ये Law of Diminishing Marginal Utility म्हणजेच "घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत" असे म्हणतात.ही केवळ घटती उपभोग्यता नसते तर ती "घटती कृतज्ञता" असते!आयुष्यात आपल्याला मिळालेल्या विविध सुखसोयींबद्दल विधात्याप्रति ऋण व्यक्त करण्याची आपली मानसिकताही घटतीच असते.आणि सर्व काही मिळाल्यानंतर तर ती शून्य होऊन जाते. कारण आपल्याला जे काही मिळाले आहे तो तर आपला हक्कच आहे, त्यात कुणाचे ऋण कसले व्यक्त करायचे, अशी वृत्ती होऊन जाते.ह्या कथेत तो शिकारी म्हणजे आपण सर्वजण आहोत आणि ती सफरचंदं म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात मिळालेल्या सर्व सुखसोयी!आपल्याकडे ह्या सर्व सोयी उदंड असताना आपल्याला कुणाच्या ऋणाची जाणीवही होत नव्हती. उलट आपण सतत कुठल्या ना कुठल्या कारणांनी उदा. नोकरीतील काम,वाढत्या किंमती, सरकारी धोरण, वाढलेला ट्रॅफिक, प्रदूषण ह्यांबाबत तक्रारीच करीत होतो. पण आज आपण 'तक्रार  मोडवरून' एकदम 'कृतज्ञता मोडमध्ये' आलेले आहोत.आज 'मला भाजी मिळाली', 'मला दूध मिळालं', 'मी सुरक्षित आहे', 'मी तंदुरुस्त आहे' असल्या गोष्टींसाठी आपण देवाचे आभार मानतो.दोन महिन्यांपूर्वी जर कुणी आपल्याला सांगितलं असतं की ह्या सर्व गोष्टी हा आपला हक्क होऊ शकत नाही, त्या आपल्याला कुणामुळे तरी मिळताहेत; तर ते पटलंही नसतं. ह्या परिस्थितीनं आपल्याला कृतज्ञ व्हायला शिकवलं हे निश्चित! आता पुढल्या आयुष्यात आपण 'कृतज्ञ' म्हणून वागायचं की 'उद्विग्न' म्हणून वागायचं हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.कृतज्ञ म्हणून वागण्याने आपला आनंद वाढतो; कारण आपल्याला काय काय मिळालं आहे याचेच विचार आपल्या मनात घोळत असतात.पण उद्वेग धारण करून वागण्याने आपल्या दुःखात भर मात्र पडते.ह्याचे एक फारच सुंदर उदाहरण म्हणजे गेल्या महिन्यात इटलीमध्ये घडलेली कथा.साठ वर्षे वयाचा एक रुग्ण बरा होऊन दवाखान्यातून घरी जायला निघतो. दवाखान्याचे बिल बघून तो ओक्साबोक्शी रडायला लागतो. डाॅक्टर मंडळी त्याला धीर देतात आणि त्याचे बिल कमी करण्याची तयारी दाखवितात. पण त्याचे रडण्याचे कारण ऐकल्यावर डाॅक्टरांच्या डोळ्यातही पाणी येते.


तो म्हणतो "मी बिलाची रक्कम पाहून नाही रडलो. माझी आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. पण ह्या बिलामध्ये शेवटच्या रकान्यात एक दिवसाच्या ऑक्सिजनचा आकार जो ५००० युरो लावलेला आहे, ते पाहून माझ्या मनात विचार आला की मी परमेश्वराचे किती देणे लागतो; कारण हा एवढा महागडा प्राणवायू मी गेली साठ वर्षे परमेश्वराकडून विनामूल्य मिळवतोय."


अशी कृतज्ञता असेल तर जीवनात फक्त आनंदच दिसणार आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त 'धन्यवाद' ह्या शब्दाची पारायणं करायची आहेत. अन्य काहीच नाही.

जेवढ्या जास्त वेळा कृतज्ञता व्यक्त कराल तेवढ्या जास्त घटना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घडतच जातील.


कृतज्ञता परमेश्वराप्रति  

आणि व्यक्तींप्रतिही!


जे विनामूल्य आहे तेच सर्वात मौल्यवान आहे.

झोप, शांतता, आनंद, हवा, पाणी, प्रकाश आणि सर्वात जरूरी आपला श्वास, नेहमी आनंदी रहा


 संकलन-आपलेगुरुजी

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने