हळद बेणे साठवण व काळजी|Turmaric plantation

 हळद बेणे साठवण व काळजी                   


    

                हळद कंदाची गुणवत्ता दीर्घकाळ टिकविण्यासाठी पिकाची योग्यवेळी काढणी आवश्‍यक असते. त्याचबरोबरीने काढणीपश्‍चात योग्यपद्धतीने साठवणही महत्त्वाची आहे; अन्यथा कंदांना कीडरोगांचा प्रादुर्भाव होऊन ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. हळद कंद दीर्घकाळ सुस्थितीत राहावेत, यासाठी काढणी करतानाही योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर काढणीपश्‍चात व्यवस्थापन ही बाबही  महत्त्वाची आहे.


हळद कंद काढणीपश्‍चात व्यवस्थापन :


हळदीचे कंद काढताना पूर्ण कालावधी झालेले परिपक्व (साधारण नऊ महिने पूर्ण झालेले) कंद काढावेत.कंद काढतेवेळी ७२ ते ७५ टक्के पाण्याचा अंश असतो तो साठवणुकीमध्ये ५० टक्केपेक्षा कमी झाल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो.हळद काढणी झाल्यानंतर बियाण्यासाठीचे कंद लगेच किंवा शक्‍य तेवढ्या लवकर सावलीत ठेवावेत.बेणे प्लॉट घ्यावयाचा असल्यास हळकुंड बेणे वापरावे. व्यापारी दृष्टिकोनातून लागवडीसाठी मातृकंद किंवा बंडा वापरावा.बेणे साठवणुकीसाठी हळदीचा पाला/उसाचा पाला/गव्हाचे काड/वाळलेले गवत यांचा वापर करावा. वापरापूर्वी हे सर्व घटक क्विनॉलफॉस २ मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणाने फवारून निर्जंतुक करून घ्यावी. निर्जंतुकीकरणानंतर हे घटक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यावेत.  

साठवणूक करताना महत्त्वाची काळजी :  


बेणे सावलीमध्ये हवेशीर ठिकाणी साठवावे.बंद खोलीत, हवा खेळती राहात नाही अशा ठिकाणी बेणे साठवू नये .बेण्याच्या मुळ्या काढू नका.मुळ्या काढल्यामुळे कंदास इजा होऊन साठवणुकीत कंद सडतात.बेणे साठवताना त्याच्यावर कार्बेन्डाझिम पावडर १ किलो प्रतिटन बेणे  या प्रमाणात धुरळावी.  बेणे बुरशीनाशकांच्या द्रावणामध्ये बुडवू नये.बेण्याचा ३ फूट उंच व जरुरीप्रमाणे लांबीचा ढीग करावा.बेण्याचा ढीग ३ फुटांपेक्षा जास्त उंचीचा केल्यास उष्णता निर्माण होऊन कंद खराब होतात. पाऊस आल्यास बियाणे झाकावे.हळदकंद साठविण्याच्या पद्धती

जमिनीवर बियाणे साठवणे:

बियाण्यांची सुप्तावस्था संपण्यासाठी २.५ महिने बेणे साठवावे लागते. त्यासाठी निर्जंतुक केलेल्या पाल्याची ६ ते ८ इंच जाडीची गादी तयार करावी. त्यावर सावलीत ठेवलेले बेणे टाकावे. एक फूट उंचीचा थर झाला की कार्बेन्डाझिम पावडर १ किलो या प्रमाणात धुरळावी. अशा पद्धतीने तीन फूट उंचीचा ढीग करावा. त्यावर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा ६ ते ८ इंचाचा थर टाकावा. त्यावर दोन दिवसांतून एकदा गोणपाट ओले करून टाकावे. आेले गोणपाट टाकताना ढिगामध्ये थंडावा राहील अशापद्धतीने टाकावे.


 

जमिनीत खड्डा करून बियाणे साठवणे:

ज्या ठिकाणी जमिनीतील पाण्याची पातळी १ मीटरपेक्षा खोल आहे अशा सावलीच्या ठिकाणी १ मीटर खोलीचा व जरुरीप्रमाणे लांबी रुंदीचा खड्डा खोदावा. खड्याच्या तळाला ढाळ किंवा उतार द्यावा. खड्ड्याच्या तळाशी ३ ते ४ इंच जाडीचा विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा. त्यावर कार्बेन्डाझिम पावडर १ किलो या प्रमाणात धुरळावी. त्यावर निर्जुंतक केलेल्या पाल्याचा ६ ते ८ इंच इतक्या जाडीचा थर द्यावा. तसेच खड्ड्याच्या बाजूलाही तेवढ्याच जाडीचा पाल्याचा थर द्यावा. एक फूट उंचीचा थर झाला की पुन्हा थरावर कार्बेन्डाझिम पावडर १ किलो याप्रमाणात धुरळावी. खड्डा ३ फूट इतक्या उंचीचा भरुन घ्यावा. त्यानंतर त्यावर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा थर टाकावा. तसेच खड्ड्यामध्ये १ मीटर अंतरावर छिद्र पाडलेले पोकळ बांबू किंवा २.५ ते ३ इंच व्यासाचे छिद्र पाडलेले पी.व्ही.सी. पाइप टाकावेत. त्यानंतर खड्डा लाकडी फळी किंवा गोणपाटाने झाकून घ्यावा. पाऊस आल्यास तेवढ्या वेळे पुरता खड्डा प्लॅस्टिक कागदाने झाकून घ्यावा.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने