ऊस लागवड माहिती व तंत्रज्ञान |sugarcane plant farming|farming techniques

 ऊस लागवड माहिती व तंत्रज्ञान 



 

◆उसाची लागवड सुरू, पूर्व हंगामी, आडसाली या तीन हंगामात केली जाते. आडसाली हंगामातील (जुलै-ऑगस्ट) पीक हे अनुकूल हवामानामुळे जोमदार वाढते.

◆तसेच आडसालीच्या पीक वाढीच्या १६-१८ महिन्याच्या कालावधीत दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळाल्याने सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते. पूर्वहंगामी ऊससुद्धा १४-१५ महिन्यांचा असल्याने त्याचे उत्पादनही चांगले मिळते.


जमीन व पूर्वमशागत

मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. किंवा त्याहून खोल) उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीची उन्हाळ्यात उभी, आडवी खोल नांगरटीनंतर जमीन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कुळवाच्या उभ्या आडव्या पाळ्यानंतर सपाटीकरण करावे.

◆रिजरच्या सहायाने भारी जमिनीत १२० सें.मी. व मध्यम जमिनीत १०० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात.

◆पट्टा पद्धतीसाठी २.५-५ किंवा ३-६ फूट अशा जोड ओळ


हंगामनिहाय ऊसाच्या जाती


१) आडसाली हंगाम

फुले २६५, को ८६०३२, को व्हीएसआय ९८०५


२) पूर्व हंगाम

फुले २६५, को ८६०३२, को ९४०१२, को.सी ६७१, को व्हीएसआ     ९८०५, व्हीएसआय ४३४.


३) सुरू हंगाम

फुले २६५, को ८६०३२, को ९४०१२, को ९२००५, को ८०१४, को सी ६७१ को व्हीएसआय ९८०५, व्हीएसआय ४३४


 

लागवड


◆लागवडीसाठी मळ्यातील बेणे वापरावे. ३ ते ४ वर्षांनी बेणे बदलावे. उसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी.

◆आडसाली उसाची लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. शक्य तो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे.

◆दोन डोळ्यांची टिपरी वापरताना, दोन टिपरीमधील अंतर १५ ते ३० सें.मी. ठेवावे. ओल्या पद्धतीने लागण चालेल.

◆मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लागणीसाठी हेक्टारी एक डोळ्याची ३०,००० तर दोन डोळ्यांची २५,००० टिपरी लागतील.


ठिबक सिंचनातून नत्रयुक्त खते

◆युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळणारे उत्तम नत्रयुक्त खत आहे.

◆लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यांत किंवा दर १५ दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून ठिबकद्वारे दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते. पारंपरिक स्फुरदयुक्त, पालाशयुक्त खते नेहमीप्रमाणे दोन समान हप्त्यांत ऊस लागवणीचेवेळी व मोठ्या बाधणीचेवेळी जमिनीतून द्यावीत.


सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर

_शेणखत/ कंपोस्ट खत (दुसऱ्या नांगरटीपूर्वी जमिनीत मिसळावे)_


१) आडसाली हंगाम

 ३० टन (५० ते ६० बैलगाड्या)


२) पूर्व हंगामी

२५ टन (४० ते ५० बैलगाड्या) प्रमाण प्रति हेक्टर


३) सुरू हंगाम

◆२० टन (३० ते ४० बैलगाड्या) शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास, ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन ४५ ते ५० दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावे.

◆रासायनिक खतांचे व्यवस्थापन करताना स्फुरद, पालाशयुक्त खते पेरून द्यावीत.

◆नत्रयुक्त खते मुळाच्या सानिध्यात द्यावीत. युरियाबरोबर निंबोळी पेंडीचा १ः६ या प्रमाणात वापर करावा.

     

आंतरमशागत व तणनियंत्रण

◆लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांनी जमीन वाफश्याबवर असताना, हेक्टहरी ५ किलो ॲट्राझीन किंवा मेट्रीब्युझिन हेक्ट्री १.२५ किलो प्रति १००० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी. आंतरपिके असल्यास शिफारशीप्रमाणे तणनाशके फवारावीत.

◆ऊस उगवणीनंतर हरळी किंवा लव्हाळा या तणांचा प्रादुर्भाव आढळल्यास, १० लिटर पाण्यात ८० मि.लि. ग्लायफोसेट या तणनाशकाची जमिनीलगत फवारणी करावी.

◆उसावर तणनाशक पडू नये, यासाठी प्लॅस्टिक हुडचा वापर करावा. उगवणीनंतर ६०-७० दिवसांनी २, ४-डी (क्षार स्वरुपातील) १.२५ किलो प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून तणावर फवारणी करावी.

◆तसेच आवश्यसकतेनुसार कृषीराजसारख्या औजारे किंवा खुरपणीद्वारे तणनियंत्रण करावे.


 

बांधणी

◆लागणीनंतर दोन-तीन महिन्यांनी बाळ बांधणी करावी.

◆लागवडीनंतर ४.५ ते ५ महिन्यांनी पहारीच्या औजाराने वरंबे फोडून, नंतर सायन कुळव चालवून आंतरमशागत करावी.

खतांची मात्रा देऊन रिजरच्या सहायाने मोठी बांधणी करावी. सिंचनासाठी सऱ्या, वरंबे सावरून घ्यावेत.


पाणी व्यवस्थापन

◆लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या ८ सें.मी. खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर १० सें.मी._ खोलीच्या पाणी पाळ्या द्याव्यात. 

_◆हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १४ ते १५ दिवसांनी, हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करू नये.

◆अधिक उत्पादन व जमिनीच्या सुपीकतेसाठी सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा अवलंब करावा, यासाठी पट्टापद्धत किंवा रुंदसरी पद्धतीचा अवलंब करावा.


 

तोडणी व उत्पादन


१) आडसाली हंगाम

_तोडणी १४ ते १६ महिन्यांनंतर करावी. प्रचलित फुले २६५, को ८६०३२ या जातींचे हेक्टरी २००-२५० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळते.


२) पूर्व हंगामी

तोडणी १३ ते १५ महिन्यांनंतर करावी. प्रचलित फुले २६५, को ८६०३२ या जातींचे हेक्टरी १५०-२०० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळते.


३) सुरू हंगाम

तोडणी १२ ते १३ महिन्यांनंतर करावी प्रचलित फुले २६५, को ८६०३२ या जातींचा वापर केल्यास हेक्टरी १२०-१५० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळते.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने