झुळूक मी व्हावे|Marathi Kavita|मराठी कविता

 ||झुळूक मी व्हावे||



वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे,

घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, 


कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी,

राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी.

हळु थबकत जावे कधी कानोसा घेत,

कधी रमत गमत वा कधी भरारी थेट.


लावून अंगुली कलिकेला हळुवार,

ती फुलून बघे तो व्हावे पार पसार.

परि जाता जाता सुगंध संगे न्यावा,

तो दिशादिशातुनि फिरता उधळुनी द्यावा.


गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर,

झुळझुळ झर्‍याची पसरावी चौफेर.

शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शात,

खुलवीत मखमली तरंग जावे गात.

कवितेचा अर्थः-                                                                 वरील कवितेमध्ये कवींनी स्वतःच्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहे.कवीला एक छोटीशी वाऱ्याची झुळूक व्हायचे आहे आणि झुळूक होऊन इकडे तिकडे मन ओढ घेईल तिकडे स्वैर भटकायचे आहे. ही भटकंती करत असताना कवी झुळूक होऊन कधी बाजारात जाणार आहे, तर कधी नदीच्या काठी जाणार आहे. तर कधी फुलांची कळी असते तिला हळूच बोट लावणार आहे आणि त्या कळीचे फूल होण्याच्या अगोदरच त्या ठिकाणाहून पसार होणार आहे. परंतु जाताना मात्र त्या फुलांचा सुगंध सोबत घेऊन जाणार आहे. त्या फुलांचा सुगंध दिशादिशातुन सर्वत्र उधळून देणार आहे. नंतर झुळूक झालेला कवी पाचूच्या शेतात जाणार आहे. तसेच नदीतून वाहणाऱ्या निळ्या पाण्यावर मखमली तरंग गाणार आहे. तर अशा या ''झुळूक मी व्हावे'' या कवितेचा अर्थ याठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी या कवितेचे चालीसह स्पष्टीकरण पाहण्यासाठी पुढील गुलाबी रंगाच्या क्लिक बटन वर क्लिक करावे.






Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने