इयत्ता दहावीच्या परीक्षेत यशासाठी वेळेचे योग्य नियोजन कसे करावे?
इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. अनेक वेळा असे दिसून येते की विद्यार्थ्यांना विषयाचे चांगले ज्ञान असूनही परीक्षेत अपेक्षित यश मिळत नाही. यामागील एक मुख्य कारण म्हणजे पेपर सोडवताना वेळेचे योग्य नियोजन करता न येणे. म्हणूनच परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी अभ्यासाइतकेच वेळेचे नियोजन करणेही तितकेच आवश्यक आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेची रचना, एकूण गुण, प्रश्नांचे प्रकार व वेळेचे विभाजन याची सविस्तर माहिती करून घ्यावी. घरी सराव करताना ठरावीक वेळेत पेपर सोडवण्याचा सराव केल्यास परीक्षेच्या दिवशी आत्मविश्वास वाढतो.
परीक्षा सुरू झाल्यानंतर सुरुवातीची दहा ते पंधरा मिनिटे प्रश्नपत्रिका शांतपणे वाचण्यासाठी वापरावीत. सर्व प्रश्न एकदा नीट वाचून कोणते प्रश्न सोपे आहेत, कोणते कठीण आहेत आणि कोणते पर्यायी प्रश्न निवडायचे आहेत हे ठरवावे. घाईघाईने उत्तर लिहिण्याऐवजी योग्य नियोजन केल्यास पुढील वेळ वाचतो. पेपर सोडवताना प्रथम सोपे आणि चांगले येणारे प्रश्न सोडवावेत. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि हमखास गुण मिळतात. प्रत्येक प्रश्न त्याच्या गुणांनुसार सोडवावा व कमी गुणांच्या प्रश्नांवर जास्त वेळ खर्च करू नये. कठीण प्रश्न अडल्यास तो प्रश्न तात्पुरता सोडून पुढील प्रश्नाकडे वळावे आणि शेवटी वेळ मिळाल्यावर तो प्रश्न सोडवावा.
परीक्षेच्या शेवटचे दहा ते पंधरा मिनिटे उत्तरपत्रिकेचे पुनरावलोकन करण्यासाठी राखून ठेवावीत. सर्व प्रश्न सोडवले आहेत का, प्रश्न क्रमांक बरोबर आहेत का, स्पेलिंग किंवा गणनेत काही चुका आहेत का याची काळजीपूर्वक तपासणी करावी. शेवटच्या क्षणी नवीन उत्तर लिहिण्यापेक्षा झालेल्या चुका दुरुस्त करणे अधिक फायदेशीर ठरते. संपूर्ण परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवावे, घाबरून न जाता आत्मविश्वासाने पेपर सोडवावा. योग्य नियोजन, नियमित सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या आधारे इयत्ता दहावीचे विद्यार्थी परीक्षेमध्ये नक्कीच उज्ज्वल यश मिळवू शकतात.
