देवावरील विश्वास-मराठी बोधकथा|Moral story|नैतिक कथा

देवावरील विश्वास-बोधकथा



 

 भगवान श्रीकृष्णाचे एक दयाळू भक्त होते. त्यांचं नाव रमेश चंद्र होतं. त्यांचे औषधाचे दुकान होते. त्यांच्या दुकानामधे एका कोपऱ्यात, भगवान श्रीकृष्णाचा एक छोटासा फोटो ठेवलेला होता.रोज सकाळी जेंव्हा ते दुकान उघडत, तेंव्हा साफ-सफाई झाल्यानंतर, हात धुऊन रोज देवाचा तो फोटो ते स्वच्छ करत असत आणि श्रद्धापूर्वक धुप वगैरे दाखवत असत.
        त्यांना राकेश नावाचा एक मुलगा होता, जो आपले शिक्षण पूर्ण करून त्यांच्या बरोबरच दुकानात बसत असे. तो आपल्या वडिलांना हे सर्व करताना बघत असे. तो नव्या पिढीतील एक शिक्षित नवयुवक असल्यामुळे, आपल्या वडिलांना समजावत असे की, देव वगैरे काही नसतं, हा सगळा मनाचा भ्रम आहे...शास्त्र म्हणत की, सूर्य आपल्या रथावर बसून संपूर्ण ब्रम्हांडाची चक्कर मारतो, परंतु विज्ञानाने मात्र हे सिद्ध केलं आहे की, पृथ्वीच सूर्याभोवती फेरी मारते... ईश्वराचे अस्तित्व नाही आहे, हे पटवण्यासाठी तो विज्ञानातील अशी नवनवीन उदाहरणं त्यांना देत असे.त्याचे वडील त्याच्याकडे प्रेमाने बघत आणि हसत असत. त्यांची या विषयावर वाद-विवाद करण्याची किंवा चर्चा करण्याची इच्छा नसे...असेच दिवस निघून जात होते. वडील आता म्हातारे झाले होते. ते समजून चुकले होते की, आपला शेवट जवळ आला आहे. म्हणून एक दिवस ते आपल्या मुलाला म्हणाले, "मुला, तू ईश्वराला मान किंवा मानू नकोस, परंतु माझ्यासाठी हेच खूप आहे, की तू एक मेहनती, दयाळू आणि प्रामाणिक माणूस आहेस. परंतु तू माझं एक म्हणणं ऐकशील आणि त्याचे पालन करशील?”
मुलगा म्हणाला, " हो, बाबा सांगा ना, जरूर ऐकेन." वडील म्हणाले, "मुला मी गेल्यानंतर, दुकानातील भगवान श्रीकृष्णाचा हा फोटो, तू दररोज स्वच्छ करत जा आणि जर कधी तू कोणत्याही अडचणीत सापडलास, तर हात जोडून श्रीकृष्णाला आपली अडचण सांग. बस, फक्त इतकच, मी सांगितलेले कर."मुलाने होकार दिला.



        काही दिवसांनंतर त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि दिवस असेच सरत राहीले. एके दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता. राकेश दिवसभर दुकानातच बसला होता आणि गिर्‍हाईकी पण कमीच होते. त्यात वीजपुरवठा पण खंडीत होत होता. इतक्यात, पावसात चिंब भिजलेला एक मुलगा, पळतच आला आणि म्हणाला, "दादा, हे औषध हवं आहे. माझी आई खूप आजारी आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे, की जर ह्याचे चार चमचे, लवकरात लवकर आईला दिले गेले, तरच आई वाचेल. तुमच्याकडे हे औषध आहे का?" राकेशने चिठ्ठी बघितली आणि लगेच म्हणाला, “हो, माझ्याकडे आहे हे औषध.” तो मुलगा खूप खुश झाला आणि औषध घेऊन निघून गेला. पण, हे काय!! तो मुलगा निघून गेल्यानंतर, थोड्या वेळाने जेव्हा राकेशची नजर काउंटर कडे गेली, आणि त्याला घाम फुटला,कारण थोड्यावेळापूर्वीच एका ग्राहकाने उंदीर मारण्याचे औषध परत केले होते. लाईट नसल्यामुळे असा विचार करून, राकेशने ती बाटली काउंटरवरच ठेवली होती, की लाईट आल्यावर ती योग्य जागेवर परत ठेवता येईल.परंतु जो मुलगा औषध घेण्यासाठी आला होता, तो आपल्या औषधाची बाटली घेऊन जाण्याऐवजी, उंदीर मारण्याचे औषध घेऊन गेला होता आणि त्या मुलाला लिहिता वाचता ही येत नव्हते!!! "अरे देवा!” अनायासपणे  राकेशच्या तोंडातून हे शब्द निघाले, "हा तर मोठा अनर्थ झाला!!" तेव्हा त्याला आपल्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट आठवली आणि तो लगेच हात जोडून भगवान श्रीकृष्णाच्या फोटोसमोर जाऊन दुःखी मनाने प्रार्थना करू लागला, "हे देवा! माझे वडील नेहमी म्हणत असत की तुम्ही आहात जर खरच तुम्ही असाल, तर आजच्या या अनहोनी पासून वाचवा. एका आईला तिच्याच मुलाच्या हातून विष पिऊ देऊ नका. देवा, तिला विष पिऊ देऊ नका !!! "दादा!" त्याच वेळी मागून आवाज आला... "दादा, चिखल असल्यामुळे मी घसरलो आणि औषधाची बाटली पण फुटून गेली! कृपया, तुम्ही मला एक दुसरी बाटली द्या...!"


 
देवाच्या, मनमोहक हास्याने भरलेल्या त्या फोटोकडे बघत राकेशच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या!!!  त्या दिवशी त्याच्या मनात विश्वास उत्पन्न झाला, की कोणीतरी आहे, जो ही सृष्टी चालवत आहे... कोणी त्याला ईश्वर म्हणतात, तर कोणी सर्वश्रेष्ठ, तर कोणी सर्वव्यापी शक्ती, तर कोणी दैवी शक्ती!
 सारांश, ”प्रेमपूर्ण आणि भक्तीयुक्त हृदयाने केलेली प्रार्थना कधीच दुर्लक्षित केली जात नाही...”


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने