थंड पाण्यात शिजणारा बोका तांदूळ माहिती आहे का?|

थंड पाण्यात शिजणारा तांदूळ माहित आहे का?


      भारत हा शेतीप्रधान देश आहे त्यातही तांदूळ हे मुख्य पीक आहे.महाराष्ट्राचा आंबेमोहोर,अजरा घनसाळ तांदूळ, कोकणातील लाल उकडा तांदूळ, उत्तर प्रदेशाचा कालानमक तांदूळ, बासमती तांदूळ,पश्चिम बंगालचा गोविंद भोग, तुलाईपंजी, मणिपूरचा चकहाओ,केरळचा हट्टा तांदूळ, पोक्कली तांदूळ,वायनाडचा गंधकसाला, जीराकसाला तसाच आसामचा करणी तांदूळ आणि बोका तांदूळ.हे सगळे भारतीय सरकार द्वारे GI  (Geographical Identification) मानांकन प्राप्त तांदूळ आहेत.

      हे जरी खरे असले तरी आसामच्या बोका तांदळाची गोष्ट काही औरच आहे आणि म्हणूनच त्यांचे वेगळेपण उठून दिसते.सर्वात प्रथम म्हणजे बोका तांदूळ शिजवण्यासाठी काहीही म़ेहनत लागत नाही.आग नाही,लाकडे नाही'उकळते पाणी नाही की गॅस सुध्दा लागत नाही.तर आसामचा हा सुवासिक असणारा जगप्रसिद्ध बोका तांदूळ चक्क साध्या थंड पाण्यात शिजतो.थंड पाण्यात साधारण एक तासभर ठेवला की खाण्यास भात तयार होतो.आहे की नाही जगावेगळी गंमत.तर असा हा जादुई बोका तांदूळ आहे.जगात मॅजिक राईस म्हणून ओळखला जातो.

     आसामच्या बोका तांदळाची लागवड

    आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजे जून महिन्यात बोका भाताची पेरणी केली जाते, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होते. बोका तांदूळ किंवा बोका चाळ आसामच्या डोंगराळ आदिवासी भागात घेतले जाते. या भातामध्ये 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन असते. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.बोका तांदूळ शेतात पिकायला साधारण साडेचार ते पाच महिने लागतात. तोपर्यंत त्यांची फार काळजी घ्यावी लागते.

     बोका तांदूळ प्रामुख्याने आसाममध्ये डोंगराळ भागात पिकवला जातो. या भाताला इथली माती आणि हवामान यातून एक वेगळी चव आणि वेगळा सुगंध असतो. बोका तांदळाची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप येथे केली जाते.

       बोका तांदूळाचे एकरी उत्पादन

    बोका तांदळाचे इतर तांदळाच्या तुलनेत एकरी उत्पादन तसे कमीच आहे.एक एकर जमिनीवर साधारण 8 ते 10 क्विंटल तांदूळ पिकतो.

    बोका तांदळापासून बनणारे पदार्थ

   बोका तांदूळ बोका चोले आणि ओरिझा सॅटिवा म्हणून देखील ओळखला जातो. आसाममधील बोका तांदळापासून जोलपान,पिठात राईस केक असे अनेक प्रकारचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात.शिवाय बोका तांदूळ दही, गूळ, दूध, साखर किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत दिला जातो.

     बोका तांदूळाचा ऐतिहासिक संदर्भ

      बोका तांदूळ हा अहोम सैनिक रेशन म्हणून वापरत असत. इतिहासाची पाने उलटली तर बोका तांदळाचा स्वतःचा एक सुवर्ण इतिहास आहे. या भाताने किती युद्धे जिंकायला मदत केली माहीत नाही. ही कथा 17 व्या शतकातील आहे.जेव्हा अहोम सैनिक मुघल सैन्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी बोका तांदूळ खात असत. हा तांदूळ रेशन म्हणून युद्धात नेण्यात आला, ज्याला शिजवण्याची गरज नव्हती कारण साध्या थंड पाण्यात तासभर टाकला की खायला भात तयार.हा बोका तांदूळ जगात फक्त भारतातील आसाम राज्यातील डोंगराळ भागातच तयार होतो.

     बोका तांदळाचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे.जो थेट आसामशी संबंधित आहे. हेच कारण आहे की भारत सरकारने आसाममध्ये पिकवल्या जाणार्‍या या भाताला GI टॅग देखील दिला आहे. बोका तांदूळाची  लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे.

      किसान टाकच्या ताज्या अहवालानुसार उत्तर प्रदेशातील शेतकरीही बोका तांदळाच्या लागवडीत खूप रस घेत आहेत. रायबरेली जिल्ह्यातील उंचाहार येथील शेतकरी रामगोपाल चंदेल यांनीही बोका भात पिकवून नवा विक्रम केला आहे.

    तर मित्रांनो फार शोध घेऊन आपल्या स्थानिक बाजारात जर कुठे आसामचा हा बोका तांदूळ मिळाला तर अवश्य आस्वाद घ्या.

बोका तांदूळाविषयी माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने